Sunil Kedar : सेंद्रीय, विषमुक्त दुध निर्मिती टप्प्यातील प्रश्नाबाबत सविस्तर अभ्यास गटाची घोषणा करण्यात आली आहे. सेंद्रीय, विषमुक्त तसेच पशुसंर्धन व दुग्ध विकास विभागाबाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढवणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबवणे. तसेच  कायदेशीर नियम बनवणं, सेंद्रीय व विषमुक्त चिकन, अंडी निर्मितीबाबत नियम बनवणे, या सर्व विषयाबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी पशुसंर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याबाबतचा अहवाल शासनाला तत्काळ दाखल करण्याच्या सुचना मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या आहेत. 


दरम्यान, महाऑरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फाच्या पुढाकारातून मंत्रालयात पशुसवंर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांच्या दालनात व विषमुक्त दुध निर्मिती व विकास या टप्प्यातील पशुसंवर्धन व दुग्ध विकासाच्या प्रश्नाबाबत उच्चस्तरिय बैठक झाली होती. या बैठकीत मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली. दरम्यान माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मागील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृहात मोर्फा सोबत पाच विभागाची बैठक पार पडली होती. त्यावेळी पवार यांनी सेंद्रीय व विषमुक्त शेतीबाबतचे विषय मार्गी लावण्याची सुचना उपस्थित सर्व मंत्र्यांना केली होती. त्यानुसार पशुसंर्धन मंत्री सुनिल केदार यांनी तत्काळ मोर्फा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, उपाध्यक्ष स्वाती शिगांडे, डॉ. रविंद्र सावंत, मोर्फाचे संचालक संजय देशमुख, कल्याण काटे, अमरजित जगताप तसेच पशुसंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


पशुपालकांना  विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲप बनवावे


विषमुक्त, सेंद्रिय दुध निर्मितीसाठी 10, 20, 50 व 100 गोठ्यांची निर्मिती करण्याच्या मोर्फाच्या मागणीला मंत्री केदार यांनी सहमती दर्शवली आहे. या योजनांसाठी अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार शासन निर्णय अमलात आणेल असे सुनील केदार यांनी सांगितले. मोर्फाच्यावतीने महानंद व आरेच्या मुंबई व पुण्यातील दुकानातून शेतकऱ्यांच्या विषमुक्त व सेंद्रीय दुध विक्री करण्याची मागणी केली ती मागणी मंत्री केदार यांनी तत्काळ मान्य करुन तशी कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच पशुपालकांना दुग्धविकास, पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना, लसीकरण व इतर मार्गदर्शन मिळण्यासाठी लवकरात लवकर ॲप बनवावे अशा सुचना केदार यांनी बैठकीत दिल्या आहेत.


बैठकीत झालेले निर्णय 


1) विषमुक्त व सेंद्रीय दुध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अडचणी व विभागाने करावयाचे काम याबाबत अभ्यासगट तत्काळ उभारण्याचे ठरले आहे.


2) महानंद व आरेच्या जागा सेंद्रीय व विषमुक्त दुध विक्रीसाठी शेतकरी व शेतकरी बचत गटांना देण्याचा निर्णय.


3) पशुसंर्धन विभाग योजनांची माहिती शेतकऱ्यांना कळण्यासाठी ॲप बनवेल.


समाजाला सुरक्षित दुधाची निर्मिती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत शासनाने सावध पावले टाकून विषमुक्त व सेंद्रीय दुध निर्मितीसाठी पुढाकार घेतला तर पुढील पिढी सुरक्षित राहणार आहे. त्यादृष्टीने ही बैठक अतिशय सकारात्मक झाली असल्याचे मत मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले. तर पशुपालन सामान्य शेतकऱ्यांसाठी सुखकर व्हावं यासाठी पायलट प्रोजेक्टला पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मान्यता दिली आहे. मोर्फाच्या मागणीला यश आल्याचे मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी सांगितले.