Ahmednagar News Update : गेल्या काही दिवसंपासून कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर घसरल्याचे बोलले जात आहे. भाव कोसळल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर  फिरवलाय. तसेच कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे. 


Onion Price :  लागवड खर्च देखील निघेना


थोरा यांनी चार एकरातील कांद्यासाठी जपळपास दोन लाख रूपयांच्या पुढे खर्च केला आहे. खतांच्या किमती गगणाला भिडलेल्या असताना देखील कांदा चांगला यावा म्हणून त्यांनी खतांचा पावर केला. कुटुंबासह अपार कष्ट करून कांद्याचे पिक देखील त्यांनी जोमात आणले. परंतु, आता कांद्याचे भाव पाच ते सहा रूपये किलोवर आले आहेत. एवढ्या दराने कांद्याची विक्री केली तर त्यासाठी घातलेले पैसे देखील निघत नाहीत. त्यामुळे त्यांनी तब्बल चार एकर कांदा पिकावर थेट ट्रॅक्टर फिरवला आणि संपूर्ण कांदा जमीनीत गाडून टाकला. थोरात यांच्यासारखीच राज्यातील सर्वच कांदा उत्पादकांची स्थिती  झाली आहे. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा काढणे टाळत आहेत. मजुरी, गाडीभाडे, हमाली, तोलाई आणि आडत यांचे पैसे खिशातून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. 


Onion Price :  शेतात या आणि फुकट कांदा घेऊन जा


भाव पडल्याने कांद्याची विक्री करून देखील त्यातून उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यापेक्षा मोफत दिला तर किमान तो कोणाच्या तरी मुखात जाईल या विचारांनी थोरात यांनी परिसरातील लोकांना शेतात येऊन फुकट कांदा घेऊन जाण्याचे आवाहन केले. थोरात यांच्या आवाहनानंतर पिंपरणे गावासह जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांची कांदा काढून नेण्यासाठी झुंबड उडाली. दोन दिवसांत चार एकर रान मोकळे झाले. याबरोबरच त्यांनी चार एकरांवरील कांदापात शेळ्या आणि मेंढ्यांना दिली.  


महत्वाच्या बातम्या


Onion Price : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली, दर घसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान