Agriculture News : पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. या प्रयोगातून भरघोस उत्पादन घेत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अशाच एका शेतकऱ्यानं पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या शेतकऱ्यानं दोन एकरवर सेंद्रिय पद्धतीन पपईचे (Organic Papaya) उत्पादन घेतलं आहे. यातून या शेतकऱ्याला मोठा फायदा मिळत आहे. आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. किलोला 25 रुपयांचा दर मिळत आहे. शेवटपर्यंत असाच दर मिळाला तर 21 ते 22 लाखाचं उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे.



दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पपईची बाग वरदान 


बाळासाहेब सरगर आणि रामदास सरगर असे पपईचे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी बंधूंची नावे आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर माळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्टा असणाऱ्या कन्हेर गावचे हे शेतकरी आहेत. या दोन बंधूंनी आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली होती. 2 हजार 100  रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली आहे. एका झाडाला अंदाजे 80 ते 100 फळे सध्या लागली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरुप आलं आहे. संपुर्णपणे शेणखताचा वापर करुन फुलवलेली पपईची बाग दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक वरदान ठरली आहे.




चेन्नई आणि कोलकातामधून पपईला मोठी मागणी


साधारणपणे आठ महिन्यात या पपईच्या शेतीला अडीच लाख रुपयापर्यंतचा खर्च झाला आहे. यातून सुमारे 21 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. या पपईला सध्या बाजारात किलोला 25 रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या सरगर बंधूंची पपई ही चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणाहून पपईला मोठी मागणी आहे. राज्यात इतर ठिकाणी पपईवर रोग पडला असल्यानं देशभरातील व्यापारी सरगर बंधूंच्या शिवारात येऊन पपई घेऊन जाताना दिसत आहेत. 




21 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत 


ड्रीप आणि कमी पाण्यावर आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पपई पिकाचा प्रयोग केला आहे. महाराष्ट्रात सध्या पपई पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. अशात आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला असल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे. आमच्या पपईला सध्या चेन्नई, कोलकाता या ठिकाणाहून मोठी मागणी आहे. जागेवर आम्हाला पपईला किलोला 25 रुपयांचा दर मिळत आहे. याचा आम्हाला फायदा होत आहे. या बागेतून आम्हाला 21 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत असल्याचे सरगर यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या: