Success Story : अलीकडच्या काळात शेतकरी (Farmers) पारंपारीक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. शेतकऱ्यांचा कल हा फळबागा लागवडीकडे अधिक असल्याचं दिसत आहे. सांगोला (Sangola) जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्यानं केळीच्या बागेतून (banana farming) आर्थिक प्रगती साधली आहे. सहा एकर केळीच्या बागेतून तब्बल 90 लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. पाहुयात या शेतकऱ्याची यशोगाथा.
 
प्रताप लेंडवे  हे सांगोला जिल्ह्यातील हळदहीवाडी येथील शेतकरी आहेत. त्यांनी केळीच्या शेतीतून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. त्यांनी मोठी मेहनत करुन केळीच्या पिकातून चांगला नफा मिळवला आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे डाळिंबाची शेती होती. मात्र, त्यांनी डाळिंबाची शेती सोडून केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना केळीच्या शेतीतून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.


सांगोला जिल्हा हा डाळिंबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध


सांगोला जिल्हा हा डाळिंबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, डाळींबावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळं शेतकरी अन्य पिकांकडे जात असल्याचे दिसत आहेत. प्रताप लेंडवे यांनी देखील डाळिंबाऐवजी केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. केळीच्या शेतीतून अवघ्या 9 महिन्यांत त्यांनी 90 लाख रुपये कमावले आहेत.


जम्मू-काश्मीरमधील व्यापाऱ्यांना 35 रुपये किलो दराने केळीची विक्री


प्रताप लेंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी ते डाळिंबाची शेती करायचे. पण डाळिंबाच्या शेतीसाठी खर्च अधिक करावा लागायचा आणि नफा कमी मिळायचा. अशा परिस्थितीत मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सांगोला तालुक्यातील हळदहीवाडी येथे प्रताप लेंडवे यांचे शेत आहे. इथेच त्यांनी केळीची लागवड केली आहे. जम्मू-काश्मीरमधील व्यापाऱ्यांना लेंडवे यांनी 35 रुपये किलो दराने केळी विकली आहे. त्यामुळं 6 एकरातून 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती प्रताप लेंडवे यांनी दिली.


एका एकरात 50 टन केळीचे उत्पादन 


प्रताप लेंडवे यांनी 6 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील केळीचा दर्जा इतका चांगला आहे की, व्यापारी स्वतः शेतात येऊन त्यांच्याकडून केळी खरेदी करतात. शास्त्रोक्त पद्धतीने केळीची लागवड केल्याचे प्रताप लेंडवे यांनी सांगितले. तसेच पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. याचा फायदा त्यांना झाला आणि चांगले उत्पन्न मिळाले. प्रताप लेंडवे यांनी जिलेल्या माहितीनुसार एका केळीच्या घडाचे वजन  हे 55 ते 60 किलो असते. यामुळेच प्रताप यांना एका एकरात 50 टन केळीचे उत्पादन मिळाले. अशा प्रकारे 9 महिन्यांत 14 लाख रुपये प्रति एकर दराने केळी विकून 90 लाख रुपये कमावले.


खर्च जाऊन निव्वळ 81 लाखांचा नफा


दरम्यान, केळीचं एक रोप लावण्यासाठी 125 रुपयांचा खर्च आल्याची माहिती शेतकरी प्रताप लेंडवे यांनी दिली. अशा प्रकारे एक एकरात केळीची लागवड करण्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावे लागतात. तर प्रताप लेंडवे यांनी सहा एकरात केळी केली आहे. यासाठी त्यांना नऊ लाख रुपये खर्च करावे लागले. त्यांचा खर्च वजा करुन त्यांना निव्वळ 81 लाख रुपयांचा नफा झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : फक्त 10 गुंठ्यात वांग्याची शेती, नफा मिळवतोय लाखोंचा; युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग