Rice Price In India : सध्या देशात गव्हाच्या किंमती (Wheat Price) वाढल्या आहेत. याबाबतची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं (Central Government) खुल्या बाजारात 30 मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. अशातच आता तांदळाच्या किंमती (Rice Price) देखील कमी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारनं आता तांदूळ खरेदीबाबत नवीन नियमावली जारी केली आहे.
34 रुपये किलो दरानं राज्यांना तांदूळ खरेदी करता येणार
केंद्र सरकारने तांदूळ खरेदीबाबत सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकारे भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी करू शकतात. त्यामुळं राज्यांना आता 34 रुपये किलो दरानं तांदूळ मिळणार आहे. राज्यातील गरिब लोकांच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवत आहेत. या योजनांसाठी राज्य सरकारला FCI कडून 34 रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
कोणत्या राज्याला किती तांदूळ द्यायचा याचा निर्णय FCI कडे
2023 मध्ये तांदूळ खरेदीसाठी केंद्र सरकारची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यामध्ये तांदळाच्या विविध जातींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरानुसार एफसीआय राज्य सरकारांना तांदूळ विकणार आहे. मात्र, कोणत्या राज्याला कधी आणि किती तांदूळ द्यायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यासाठी FCI ला पूर्ण अधिकार आहे. म्हणजे FCI त्यांना पाहिजे त्या राज्याला तांदूळ विकू शकते.
ई-लिलावाची गरज भासणार नाही
सामान्यत: पारदर्शकतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या लिलावाद्वारे मालाची खरेदी केली जाते. मात्र, या तांदूळ खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची निविदा किंवा ई-लिलाव आवश्यक करण्यात आलेला नाही. एफसीआयकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळात फोर्टिफाइड तांदूळही असणार आहे.
इथेनॉल तयार करण्यासाठीही तांदळाची खरेदी
देशातील कंपन्या जैव इंधन धोरणांतर्गत इथेनॉल तयार करण्यासाठी तांदूळ खरेदी करतात. या प्रक्रियेअंतर्गत कंपन्या ई-लिलावाद्वारेच तांदूळ खरेदी करू शकतील, अशा सूचना नव्या मार्गदर्शक तत्त्वात देण्यात आल्या आहेत. यामध्ये तांदळाचा भाव प्रतिक्विंटल 2 हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. राज्य सरकारांनी EPFCI कडून फोर्टिफाइड तांदूळ खरेदी केल्यास त्यांना प्रति क्विंटल 73 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: