Agriculture news : हिमाचल प्रदेशातील (Himachal pradesh) सफरचंद (apple) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मागणीवरुन केंद्र सरकारनं नाफेडमार्फत (Nafed) सफरचंद खरेदीसाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती हिमाचल सरकारच्या मागणीचा आढावा घेईल आणि त्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे केंद्र सरकार तांदूळ आणि गव्हाप्रमाणेच नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सफरचंदांना रास्त दर मिळू शकणार आहे.
2021 मध्ये केंद्र सरकारने मार्केट इंटरव्हेंशन स्कीम अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून थेट सफरचंद खरेदी केली होती. यामुळं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले नाही. त्यांच्या पिकाला योग्य दर मिळाला. त्यामुळेच आता हिमाचलमधील शेतकऱ्यांनी सफरचंद खरेदी सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यानंतर आता सरकार नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळं सफरचंदाच्या बागांचे मोठं नुकसान
यावर्षी हिमाचल प्रदेशात सफरचंद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळं अनेक सफरचंद बागांना भूस्खलनाचा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळं सफरचंदाची फळेही झाडावरच कुजली आहेत. त्यामुळं उत्पादनावरही परिणाम झाला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात पावसामुळं अनेक रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळं फळबागांमधून सफरचंद वेळेवर बाजारपेठेत पोहोचू शकत नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
केंद्र सरकारनं केली समितीची स्थापना
आधी हवामानामुळे पिकाची नासाडी झाली आहे. तर आता सफरचंदांना बाजारात रास्त दर मिळत नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनेही तांदूळ आणि गव्हाच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हिमाचल सरकारने केंद्राकडे नाफेडमार्फत सफरचंद खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. यानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली.
सफरचंद उत्पादनात हिमाचल प्रदेशचा वाटा 25 टक्के
काश्मीरनंतर सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन हिमाचल प्रदेशात होते. सफरचंद उत्पादनाच्या बाबतीत हिमाचल प्रदेश देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिमाचलचे सफरचंद देशातच नाही तर शेजारील देश नेपाळमध्येही पुरवले जातात. विशेष म्हणजे देशात उत्पादित होणाऱ्या एकूण सफरचंदांमध्ये हिमाचल प्रदेशचा वाटा 25 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या: