Ravikant Tupkar : यावर्षी शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालं आहे. पाऊस नाही तरी सरकार दुष्काळ (Drought) जाहीर करत नाही. त्यामुळं सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करुन कापसाला 12 हजार आणि सोयाबीनला 10 हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे. तसेच जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं असे ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार यात्रा काढली, पण सरकार झोपल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान, 28 तारखेला बुलढाणा येथून मुंबईला मुक्कामी जाणार आहे, रोख सको तो रोख लो असा इशारा तुपकरांनी दिला आहे. 


सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचं पुढचं आंदोलन होणारच असे तुपकर म्हणाले. काल माझ्या घरी शंभर पोलीस आले आणि मला अटक करून न्यायलायाला सांगितलं यांच्या आंदोलनाने राज्यातील वातावरण बिघडत आहे. याला पंधरा दिवस जेलमध्ये टाका. पण न्याय व्यवस्थेनं माझी सुटका केली. सरकार हे आंदोलन मोडू पाहत आहे. मंत्रालयात हे सगळे मजा मारत आहेत आणि आमच्या सारख्यांना अटक करतात. आम्ही काही भीक मागत नाही. आमच्या कष्टाची लढाई आहे, हे आमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुपकर म्हणाले.


29 नोव्हेंबरला मंत्रालयात जाणारच 


येत्या 28 तारखेला जर मागण्या मंजूर झाल्या नाहीतर 29 नोव्हेंबरला मंत्रालयात जाणारच असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. मी शेतकऱ्यांना सांगतो की, माझ्या जीवाचा काही झालं तर चालेल पण शेतकऱ्यांना मदत करा. मी जे करतो ते प्रामाणिकपणे करतो.
 काही सत्ताधारी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकरांनी मांडली. जर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी गप्प बसणार नाहीत. 
राज्यात गावागावात उद्यापासून धरणे आंदोलन करा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी  शेतकऱ्यांना केलं. माझी सर्व राज्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की, उद्यापासून गावा गावात आंदोलने करा, प्रभात फेरी काढा. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं. तसेच चिखली तालुक्यातीस सोमठाना गावात राज्यभरातून शेतकऱ्यांनी यावं असेही तुपकर म्हणाले. 28 तारखेला बुलढाणा येथून मुंबईला मुक्कामी जाणार रोख सको तो रोख लो असा इशारा तुपकरांनी दिला आहे. 


सामान्य शेतकऱ्याला जर त्रास दिला तर याद राखा


आम्ही मरायला तयार आहोत तर मारायला ही तयार आहोत. सामान्य शेतकऱ्याला जर त्रास दिला तर याद राखा असा इशार रविकांत तुपकरांनी दिला आहे. सरकारने आमचं आंदोलन गंभीरतेनं घ्यावं. जर का सामन्यांच्या हातात आंदोलन गेलं सरकारला महागात पडेल असे तुपकर म्हणाले. आज रात्री शेतकऱ्यांशी चर्चा करुन उद्याची भूमिका ठरवू. आम्ही मर्दाची औलाद आहोत, आम्ही सांगून आंदोलन करू असे तुपकर म्हणाले. आम्ही मुंबईत जाऊच असे तुपकर म्हणाले. मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. पण त्यांना आमदार खासदार विकत मिळतात असे तुपकर म्हणाले.