Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं (Sowing) संकट आलं आहे. याबाबत शेतकऱ्यांना काय मदत करता येईल यावर सरकार विचार करत असल्याचं मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. ते राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  


पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात पावसानं मारली दडी


राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. ज्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावलं आहे, अशा ठिकाणी काय मदत करता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळं तिथं दुबार पेरणीचा संकट ओढावले आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण होत आहे. इकडेही पाऊस पडावा अशीच प्रार्थना आपण देवाकडे करत आहोत. मात्र, सरकार देखील याबाबत गंभीर असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे


शेतकऱ्याच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळावा, अन्यथा...


सरकारने दुधाला 34 रुपये दर देण्याचं निश्चित केल्यानंतरही काही खासगी संस्थांकडून पळवाटा काढून दुधाला कमी दर दिला जात असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. एस एन एफ चा मुद्दा पुढे करुन खासगी संस्था शेतकऱ्यांचे पैसे कापत आहेत. मात्र हे चुकीचं आहे. याबाबत मी सचिवांना आदेश दिले असून, अशा संस्थांच्या विरोधात काय कारवाई करता येईल याबाबत विचार सुरू आहे. शेतकऱ्याच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळावा ही आमची भूमिका असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


अहमदनगरच्या ढवळपुरी या ठिकाणीच शेळी मेंढी संशोधन प्रकल्प होणार


अहमदनगरच्या ढवळपुरी येथे होत असलेला शेळी मेंढी संशोधन प्रकल्प कुठेही हलवणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे. ढवळपुरी परिसरामध्ये सैन्य दलाचा युद्धसराव करण्याचे मैदान असल्याने तिथे बांधकाम करता येत नसल्याचं सांगत संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले. ढवळपुरी येथे राज्यातील पहिला शेळी मेंढी संशोधन प्रकल्प दुसरीकडे हलवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत राधाकृष्ण विखेंना विचारले असता ते बोलत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Anna Hazare : विखे पाटलांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, लोकायुक्त कायदा संमत करण्यासंदर्भात चर्चा; पुढच्या अधिवेशनात विधेयक मंजूर होणार