Wheat : हवामानातील चढ-उताराचा फटका यावर्षी गव्हाच्या पिकाला (Wheat Crop) बसण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील 'क्लायमेट फ्लक्चूएशन'मुळं गव्हाचं पीक कालावधीपुर्वीच पक्वं होण्याची परिस्थिती आहे. रब्बी हंगामात (Rabbi Season) जानेवारीत लागवड केलेल्या गव्हाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. याचा थेट परिणाम उत्पादनासोबतच गव्हाच्या दर्जावरही होण्याची शक्यता आहे. 


दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी


गहू हे आपल्या देशातलं सर्वात महत्वाचं रब्बी पीक आहे. मात्र, यावर्षी मात्र, गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसतोय. हा फटका आहे वातावरण आणि तापमानात होत असलेल्या चढ उतारांचा. आपल्या देशात साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी केली जातेय. तापमानातील चढ-उताराचा सर्वाधिक फटका हा जानेवारीत उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला बसणार असल्याची माहिती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याच्या वरिष्ठ संशोधक (गहू संशोधन विभाग)  डॉ. स्वाती भराड यांनी दिली.


गव्हाचं लागवड क्षेत्र आणि उत्पादन


यावर्षी देशात 34.30 मिलियन हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 0.28 हेक्टर क्षेत्र वाढलं आहे. यावर्षी महाराष्ट्राच 13 लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्र 9 लाख हेक्टर एव्हढं होते. यावर्षी देशभरात 106 मिलियन टन गव्हाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. 


पिकाच्या उत्पादनासोबत दर्जाही कमी होणार


गव्हाच्या पेरणीनंतर यावर्षी पिकाला पोषक अशी थंडीही पडली नाही. त्यामुळं त्याचा थेट परिणाम पिकाच्या पक्वतेवर झाला आहे. यासोबतच जानेवारी महिन्याच्या मध्यापासून अनेक ठिकाणी ऊन आणि थंडीचा खेळ सुरू झाला आहे. दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळं वाढलेला गारठा यामुळे पिकाच उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळं जानेवारी महिन्यात पेरणी केलेल्या गहू अकाली पक्व होण्याचं संकट उभं राहिलंय.


गहू, कांदा यासारख्या पिकांनाही फटका


अलिकडे राज्यासह विदर्भाच्या हवामान आणि तापमानात मोठे बदल झाले आहेत. या 'क्लायमेट आणि टेंपरेचर फ्लक्चूएशन'मुळं नागरिक हैराण झालेत. गहू, कांदा आणि ऊसासारख्या पिकांनाही त्याचा फटका बसल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. वातावरण आणि तापमानातील बदल हे भारतीय शेतीसमोरचं भविष्यातील फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं कृषी विद्यापीठं आणि कृषी शास्त्रज्ञांसमोर या संकटावर उत्तर शोधण्याचं मोठं आव्हान आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wheat Production : वाढत्या तापमानामुळं गहू उत्पादक शेतकरी चिंतेत; 'या' राज्यात तापमानात 10 अंश सेल्सिअसची वाढ