Pune Nylon Manja : अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) कर्मचाऱ्याचा  (nylon manja) नायलॉनच्या मांजाने गळा कापला (Throat Cut) आहे . सुदैवाने ते बचावले असून त्यांच्या गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोन पोलीस कर्मचारी (Pune Police) जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आली आहे. 


मकरसंक्रांतीला (Makar Sankranti) बंदी असतानाही नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरले जातात. त्यामुळे पक्षी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात नायलॉन मांंजाची विक्री करत असतात. पतंग दूरपर्यंत उडतो अशी अनेकांची समजूत आहे. त्यामुळे अनेक हौशी नायलॉन मांजाचा वापर करतात. मात्र या मांज्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 


दुचाकीवरुन जाताना गळ्यात मांजा अडकला


अग्निशमन दलाचे कर्मचारी नवनाथ मांढरे हे मंगळवारी दुपारी दोन वाजता भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्रात आले होते. त्यानंतर त्यांना ड्युटीसाठी कोंढवा येथे पाठवण्यात आले. ते कोंढवा येथे जात असताना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. गाडी थांबवेपर्यंत त्यांचा गळा कापला. त्यांच्या गाडीचा वेग कमी असल्याने ते थोडक्यात बचावले. यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन कर्मचारी गणेश ससाणे यांना फोन करुन सांगितले. त्यांनी लगेच ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे धाव घेतली. त्यांनी मांढरे यांना तातडीने बिबवेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्यावर दहा टाके घालण्यात आले आहेत.


दोन पोलीस कर्मचारी जखमी


दरम्यान नायलॉनच्या मांजामुळे (nylon manja) दोन पोलीस  कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर ही घटना घडली होती. यात दोन्ही पोलीस (police) जखमी झाले आहेत. एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला होता. दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत असताना ही घटना घडली होती.  महेश पवार आणि सुनिल गवळी अशी या दोन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही पोलीस पुणे सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन जात असताना मानेत मांजा अडकला आणि पवार यांच्या मानेला जखम झाली. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेला सहकारी त्यांचा हात चिरला, अशी माहिती पक्षीप्रेमी बाळासाहेब ढमाले यांनी दिली. नायलॉन मांजा वापरु नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.