Agriculture News : कृषी आणि मृदा उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही कृषी वैज्ञानिकांची जबाबदारी असल्याचे मत केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी व्यक्त केले. शेतामध्ये पोषक तत्वांचा गरजेपेक्षा अधिक आणि बेसुमार वापर केल्यामुळे, जमिनीची सुपिकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी आणि सरकारनं एकत्रित काम करुन, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज असल्याचे मांडवीय म्हणाले.
कृषी उत्पन्न वाढवणे ही आपली जबाबदारी
मृदा आरोग्य आणि जमिनीच्या शाश्वत सुपिकतेसाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पोषकांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणासंदर्भात डॉ. मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. रासायनिक खतांचा बेसुमार वापर होणाऱ्या भागात आज वाढत्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. कृषी उत्पन्न वाढवणे ही आपली जबाबदारी आहे, मात्र त्याचवेळी, आपल्याला संपूर्ण कृषी व्यवस्था अशाप्रकारे मजबूत करायची आहे, जेणेकरुन, आपल्याला जमिनीच्या कसाबाबत तडजोड करावी लागणार नाही. तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही असे डॉ. मांडवीय म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील कृषी वैज्ञानिकांच्या भूमिकेचे महत्त्वही अधोरेखित केलं.
वैज्ञानिक आणि त्यांनी देशाला दिलेले योगदान यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आता, कृषी तसेच मृदा उत्पादकता या दोन्ही क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना करत लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे ही वैज्ञानिकांची जबाबदारी आहे. या उपाययोजना अशा असायला हव्यात, की त्या शेतकऱ्यांना देखील सहज समजतील आणि त्यांनाच त्याची अंमलबजावणी करता येईल असे मांडवीय म्हणाले.
शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा वापर वाढावा
रासायनिक खते वापरण्यास सुलभ आहेत म्हणूनच, लोक त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, या कार्यशाळेचा उपयोग आपण भारतात शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा वापर वाढवण्यासाठीच्या चर्चेसाठी करणे महत्वाचे असल्याचे मत नीती आयोगाचे सदस्य, प्रा. रमेश चंद यांनी व्यक्त केले. खते विभागाचे सचिव, रजत कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकारनं कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्याचवेळी, जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. देशात खतांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे रासायनिक खतांमुळे होणारी हानी भरून काढू शकतील अशा शाश्वत कृषी पद्धतींची गरज असल्याचे मत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या: