Subsidy on Green House: शेतकरी सातत्यानं शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगला नफाही मिळवत आहे. मात्र, शेतकऱ्यांना सातत्यानं नैसर्गिक संकटांचा (Natural Disaster) सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. राजस्थान सरकारनं शेतीला हवामान बदलाचा (Climate Change) फटका बसू नये यासाठी हरितगृह (Greenhouse) उभारणीच्या खर्चावर 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हे अनुदान दिले जात आहे.
पॉलीहाऊस, ग्रीन हाऊसमध्ये अशा संरक्षित ठिकाणी बिगरहंगामी भाजीपाल्याची यशस्वी लागवड करता येते. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घेता येते. ग्रीनहाऊसमध्ये पिकवलेल्या भाज्यांचे हिवाळ्यात दव आणि उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्र लाटेपासून संरक्षण करता येते. त्यामुळं राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना आता यासाठी अनुदान दिलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ
प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लहान, अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ग्रीन हाऊसच्या खर्चावर 70 टक्क्यांचं अनुदान दिलं जात आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणात 50 टक्क्यांचं अनुदान दिल जात आहे. या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला किमान चार हजार चौरस मीटरचे हरितगृह उभारावं लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अर्ज करताना शेतकऱ्याला त्याचे मूळ रहिवासी प्रमाणपत्रही जोडावं लागणार आहे. तसेच शेततळ्यात सिंचनाची व्यवस्था असणं गरजेचं आहे. माती-पाणी परीक्षण केल्याचा चाचणी अहवाल द्यावा लागणार आहे. तसेच शेतकऱ्याला जात प्रमाणपत्रही जोडावं लागणार आहे.
कुठे कराल अर्ज
राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येत असलेल्या ग्रीन हाऊसवरील अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज किसान या अधिकृत पोर्टलवर rajkisan.rajasthan.gov.in वर अर्ज करावा लागेल. शेतकरी त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा ई-मित्र केंद्रावर देखील अर्ज करू शकतात. या योजनेच्या संदर्भात, राजस्थान सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://dipr.rajasthan.gov.in/ वर तपशील देखील देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी किंवा फलोत्पादन विभागाच्या कार्यालयाशीही संपर्क साधू शकता.