Panjabrao deshmukh interest subsidy scheme : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr. Panjabrao deshmukh interest subsidy scheme) लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात पुणे (Pune) जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा करण्यात आले आहेत.
तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते. तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 60 हजार 254 शेतकऱ्यांना 12 कोटी 91 लाख 69 हजार 939 रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून 2 लाख 28 हजार 663 शेतकऱ्यांना 44 कोटी 40 लाख 7 हजार 86 रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.
व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मुदतीत परतफेड
यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक कृषी निविष्ठा, बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करत आहेत. त्यामुळं बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होम्यास मदत होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: