Agriculture News : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल (climate Chnage) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावर आहे. त्यामुळं खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम (Rabi Crop) देखील वाया जातो की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळं हरभरा (Gram Crop) पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, असं आवाहन  कृषी सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण)  डॉ. तुकाराम मोटे (Tukaram Mote) यांनी केले आहे.  सध्या आढळून येणारी कीड ही अंडी अवस्थेत म्हणजे प्रथम अवस्थेतील अळी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली असून, ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. त्यामुळं  शेतकऱ्यांनी शेताची कोळपणी किंवा निंदणी करून पिक तणविरहित ठेवून घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट करावे. तसेच घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे जमिनीपासून एक मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

कसा रोखाल घाटेअळीचा प्रादुर्भाव

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी पक्षी थांबे उभारावेत. पिक कळी अवस्थेत असताना पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन 300 पीपीम पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी. व्ही. 500 एल. ई. 1 मिली प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम निळ टाकून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.  किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5, एसजी 4.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 1805 एससी 25 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन

किटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतात किटकनाशकांचा वापर करताना हातमोजे आणि तोंडावर मास्कचा वापर करावा. तसेच सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra News : राज्यात हजारो शेतकऱ्यांचा हरभरा पडून, उद्दीष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी थांबवली