उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी थांबवली
हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. खरेदी 29 मे रोजी बंद होणार होती परंतु कोणतीही सूचना न देता खरेदी बंद केल्याने शेतकरी त्याचबरोबर नाफेड हमीभाव खरेदी केंद्रातील संचालक यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली आहे.
महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. कारण या भागातील हवामान आणि कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याचे पीक उत्तम पद्धतीने घेता येते. त्यामुळे या भागातील शेतकरी हरभऱ्याच्या पिकाला पसंती देताना दिसत आहेत. कारण हरभऱ्याला नेहमी नाफेडच्या वतीने हमी भावाने खरेदी केली जाते. त्यामुळे हरभऱ्याच्या पिकाला अगोदरच भाव निश्चित असल्याने शेतकऱ्याला याचा फायदा होतो. यावर्षी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रामध्ये राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड केंद्राकडे नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही नोंदणी करत असताना नाफे च्या वतीने शेतकऱ्यांना 29 मे पर्यंत हरभऱ्याची खरेदी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा नाफेड हमीभाव खरेदी केंद्र संचालकांना कोणतीही नोटीस न देता अचानक पणे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड खरेदीची वेबसाईट पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि खरेदी थांबवण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीविना पडून आहे. नाफेड खरेदी केंद्र बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांना हरभरा आता स्थानिकच्या लोकल मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. त्यामुळे गेली सहा महिने जपलेल्या या हरभऱ्याच्या उत्पन्नाचा मोबदला हाती येणे अगोदरच सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. राज्य आणि केंद्र सरकारने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे आणि खरेदी विना शिल्लक राहिलेला सर्व हरभरा हा खरेदी करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे