श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिंकडे;
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा
गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले
नभोमंडपी कुणि भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो
सांज अहाहा! तो उघडे,
तरू शिखरांवर, उंच घरांवर
पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती
अनंत संध्या राग पहा;
पूर्ण नभांवर होय रेखिले
सुंदरतेचे रूप महा...

बलाकमाला उडता भासे
कल्प सुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती
ग्रहगोलचि कि एकमते.

फडफड करूनी भिजले
अपुले पंख पाखरे सावरती;
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी
निजबाळांसह बागडती.

खिल्लारे ही चरती रानी
गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा
श्रावण महिमा एकसुरे

सुवर्णचंपक फुलला,
विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजात ही बघता भामा,
रोष मनीचा मावळला!

सुंदर परडि घेउनि हाती
पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला,
रम्य-फुले पत्री खुडती

देव दर्शना निघती ललना,
हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे
श्रावण महिन्याचे गीत...

marathi.abplive.com