छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला आफजल खानाचा केलेला वध. याच शौर्याचा दिवस म्हणून शिवप्रताप दिन म्हणून प्रतापगडावर साजरा केला जातो. शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वरुढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी जाते. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज प्रतापगडावर मुख्यमंत्र्याच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. अविस्मरणीय असा हा सोहळा व्हावा यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. इतकंच काय तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा ही दाखवली जाणार आहे.