सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय.
नवी दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरल्यानंतर मुंबईतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे.
समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला.
सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पाहायला मिळाला.
सोमवारी कुलाबा परिसरातील हवा दिल्लीच्या संपूर्ण हवेच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. दिल्लीतील संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 331 नोंदवण्यात आला होता.
तर मुंबईतील कुलाबा परिसरातील एक्यूआय ३४५ नोंदवण्यात आला आहे.
जो दिल्लीच्या पटीत काही जास्तआहे. तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी मुंबईकरांना घ्यायची आहे.
मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी बघायला मिळते आहे.
मागील 5 वर्षात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दुप्पट वाढ झाली आहे.