पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.
त्याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे.
या फेट्यावर आता काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे.
राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते, असं काँग्रेस नेते मोहन जोशींनी म्हटलं होतं.
जोशी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून कॉंग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे.
तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं. विरोधानंतर फेट्यावरील राजमुद्रा हटवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलाय. डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसरात काँग्रेसने मोदी गो बॅकचे बॅनर लावलेत.