हिंदू धर्मानुसार, दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने लंकेचा पती रावणाचा वध केला. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दहन केलं जातं. महाराष्ट्रात अकोला येथील पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव याला अपवाद आहे. कारण या गावात रावणाची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान आहे. रावणातील दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील चांगल्या गुणांची इथे पूजा होते. असे म्हणतात, तब्बल दोनशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत आहे. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो. तपस्वी, बुद्धिमान, महापराक्रमी, वेदाभ्यासी, एकवचनी या गुणांमुळे सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. येथील रावणाचे मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलले जाते. सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे.