बर्मिंगहॅम कसोटी सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननंतर आता भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र, अश्विन, विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं या सामन्यावर धोक्याचं ढग दाटून आले आहेत. यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. यामुळं तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यातच विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, आता तो बरा असल्याचं समजत आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. यापूर्वी विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.