मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या फिर्यादीत करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांसमोर मारहाण करून अपमानास्पद वागणूक देत अतोनात छळ केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. 2018 मध्ये त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा विवाह झाला आहे. स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.