पालघर जिल्ह्यामधील जव्हार हे मिनी महाबळेश्वर समजलं जातं. पावसाळा सुरु झाला की येथील वातावरण रमणीय बनते. जव्हार हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालले आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या दाभोसा आणि हिरडपाडा या धबधब्यांची ऊंची किमान 300 फूट आहे. सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा या गावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघरसह मुंबई, नाशिक, गुजरात आणि सिल्वासामधून पर्यटक या धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बाराही महीने सुरु असतो वर्षाऋतुमध्ये धबधब्याजवळील हिरवळीने या दोन्ही धबधब्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसते दाट धुके आणि कोसळणारे धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे हिरवळच असल्याने बाराही महिने वातावरण प्रसन्न असतं.