एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.



आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे.



वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे.



ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



मुंबईत कालपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तसेच रात्रभरही पाऊस कोसळत होता.



राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय.