इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पहिलं पदक मिळवलं आहे.
भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.
त्याने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे.
यावेळी मलेशियाच्या मोहम्मद याने 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं.
55 किलो वजनी गटात सहभागी संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नातच 135 किलोग्राम वजन उचललं. ज्यामुळे तो सर्वांत पुढे पोहोचला.
त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 113 किलोग्राम वजन संकेतने उचललं. त्यामुळे त्याने एकूण (113+135) 248 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला.
दुसऱ्या प्रयत्नात संकेतने 139 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अयशस्वी झाला. तेव्हाच त्याच्या हातालाही दुखापत झाली.
तिसऱ्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला पण दुखापतीमुळे तो अयशस्वी ठरला. ज्यामुळे अखेर त्याचा स्कोर 248 किलोग्राम इतकाच राहिला.