गरुड पुराणात माणसांच्या सत्कर्म आणि दुष्कर्मांबद्दल सांगण्यात आलं आहे. मृत्यूनंतर आपल्या कर्माचं मोजमाप होतं आणि त्यानुसार आपल्याला स्वर्गात किंवा नरकात पाठवलं जातं.
गरुड पुराणात काही गोष्टी अत्यंत चुकीच्या समजल्या जातात आणि त्यांना पाप समजलं जातं. असं पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळते. यापैकी एक गोष्ट म्हणजे - परस्त्रीशी संबंध ठेवणे.
जो व्यक्ती बायकोची फसवणूक करुन परस्त्रीशी संबंध ठेवतो किंवा जी स्त्री नवऱ्याची फसवणूक करुन दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकवास लाभतो आणि त्याचा फार छळ केला जातो.
एकाच वेळी अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणं देखील पाप आहे. गरुड पुराणात अशा अनेक पापांसाठी विविध शिक्षांबदद्ल सांगण्यात आलं आहे.
जो व्यक्ती दुसऱ्याची बायको-मुलं चोरतो, दुसऱ्याची धन-संपत्ती चोरतो आणि दुष्कर्म करतो, तो तामिस्र नरक भोगतो. चोरीशी संबंधित या नरकात भयंकर अंधार आहे.
तामिस्र नरकात पापी जीवाला बेशुद्ध होईपर्यंत लाठीने मारुन त्याचा छळ केला जातो. आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा पुन्हा त्याचा यमदूतांकडून छळ केला जातो. हा क्रम कित्येक शे वर्षे चालू राहतो.
जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो अंधतामिस्र नरकात जातो. तसेच जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या मागे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, ती देखील या नरकात जाते. येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात, त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात.
अंधतामिस्र नरकात पोहोचण्याआधीच, पापी जीव विविध प्रकारच्या दुःखांना बळी पडतो. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्याचा नरकात वाईट छळ होतो. विद्वान ऋषी या नरकाला अंधतामिस्र, अंधकारमय नरक असं म्हणतात .
जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी-पुरुषांशी संबंध ठेवत असेल तर यमदूत त्याला तप्तसूर्मि नावाच्या नरकात पाठवतो.
तप्तसूर्मि नरकात तो पापी जीव तळपत्या लोखंडी जाड सळईभोवती गुंडाळला जातो. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळतं लोखंड टाकलं जातं आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते.
गरुड पुराणानुसार जो व्यक्ती जसे पाप करतो, त्याला तसे परिणाम भोगावे लागतात. जे धार्मिक असतात ते स्वर्गात जातात आणि विविध प्रकारच्या सुखसोईंचा उपभोग घेतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.