Maharashtra Kesari : सातारातल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्घाटनाआधीच धक्का
कोरोनाच्या संकटामुळं तब्बल दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी राज्यातल्या सर्वोत्तम पैलवानांनी शड्डू ठोकण्याआधीच या कुस्ती स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचा एक प्रमुख दावेदार असलेल्या पुण्याच्या शिवराज राक्षेला खांद्याच्या दुखापतीमुळं स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र केसरी आणि राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं ५ ते ९ एप्रिल या कालावधीत साताऱ्यात आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचा शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी किताबाचा एक प्रमुख दावेदार मानण्यात येत होता. शिवराजनं यंदाच्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. जागतिक रॅन्किंग कुस्ती स्पर्धेत त्यानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याची कामगिरी बजावली होती. त्यामुळं शिवराज राक्षेकडून यंदा महाराष्ट्र केसरीत मोठी अपेक्षा बाळगण्यात येत होती. पण खांद्याच्या दुखापतीनं उचल खाल्ल्यामुळं शिवराजनं या स्पर्धेतून माघार घेतली आहे.