Ind vs Pak Cricket Match : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय
Ind vs Pak Cricket Match : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव करत सुपर 8 च्या दिशेने पाऊल टाकलेय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावांतच ऑलआऊट झाला. त्यात 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून शानदार सुरुवात झाली. भारताच्या विजायाची शक्यता फक्त 8 टक्के असल्याचं सांगितलं जात होतं. पण भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या 8 षटकात सामना फिरवला. जसप्रती बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह यांनी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत सामना फिरवला. जसप्रीत बुमराहने 15 व्या षटकात मोहम्मद रिझवान याचा त्रिफाळा उडवत पाकिस्तानच्या जबड्यातून मॅच माघारी आणली. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सामन्याचा टर्निंग पॉइंट 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह यानं बाबर आझम याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला अनुभवी मोहम्मद रिझवान तळ ठोकून उभा होता. त्यानं आपला अनुभव पणाला लावत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेलं होतं. दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या, पण रिझवान चिवट फलंदाजी करत होता. पाकिस्तानला 48 चेंडूत फक्त 48 धावांची गरज होती. सामना पाकिस्तान जिंकणार असेच सर्वांना वाटत होतो. पण 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने रिझवानचा त्रिफाळा उडवला अन् भारताच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. रिझवानची विकेट हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.