Divya Deshmukh World Cup Final | पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू अंतिम फेरीत!
भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. चीनच्या तॅग झोगईवर तिने १.५ विरुद्ध ०.५ अशा फरकाने मात केली. वर्ल्ड कपची फायनल गाठणारी दिव्या पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताची कोनेरू हम्पी चीनच्या ली तिंगईशी लढत आहे. हम्पी आणि ली तिंगई यांच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यात बरोबरी झाली असून, आज टाय ब्रेकरचे सामने होणार आहेत. जर हम्पीने तिंगईवर मात केली, तर फायनल भारताच्याच दिव्या आणि हम्पीमध्ये होण्याची शक्यता आहे. दिव्या देशमुखचा जन्म नागपूरमध्ये ९ डिसेंबर २००५ रोजी झाला. तिचे आई नम्रता आणि वडील जितेंद्र दोघेही डॉक्टर आहेत. भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिरमध्ये तिचे शिक्षण झाले. २०२१ मध्ये दिव्या भारताची २१ वी महिला ग्रँडमास्टर ठरली. २०२२ मध्ये तिने महिलांचे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. फिडे चेस ऑलिंपियाडमध्ये दिव्याला सांघिक सुवर्णपदक मिळाले. डिसेंबर २०२४ मध्ये दिव्या भारताची दुसऱ्या क्रमांकाची बुद्धिबळपटू ठरली. २३ जुलै २०२५ रोजी ती जागतिक बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.