India Wins World Cup Celebration in Nagpur : भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय, नागपुरात मोठा जल्लोष
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला गेला. या महामुकाबल्यात भारतानं 4 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या विजयाची खरी शिल्पकार कोहली आणि पांड्या यांची शतकी भागिदारी ठरली. सामन्यात आधी गोलंदाजी करत भारतानं 159 धावांत पाकिस्तानला रोखलं खरं पण 160 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजी बऱ्यापैकी मोडीत काढली. पण स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी 113 धावांची विक्रमी भागिदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता नागपुरात मोठा जल्लोष केला जातोय.