Asia Cup 2022 : रोहित सेनेला चुका नडल्या, पाकिस्तानची टीम इंडियावर सनसनाटी मात
पाकिस्ताननं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियावर सनसनाटी मात केली. पाकिस्ताननं हा सामना एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून जिंकला. या विजयासह पाकिस्ताननं आशिया चषकाच्या फायनलच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं. पण टीम इंडियाला फायनल गाठायची, तर रोहित सेनेसमोर आता श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांना हरवण्याचं आव्हान आहे. दरम्यान, सलामीचा मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं ५१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. रिझवान आणि मोहम्मद नवाझच्या ७३ धावांच्या भागीदारीनं पाकिस्तानला विजयपथावर नेलं. नवाझनं २० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. त्याआधी या सामन्यात टीम इंडियानं २० षटकांत सात बाद १८१ धावांची मजल मारली होती. विराट कोहलीची ४४ चेंडूंमधली ६० धावांची खेळी भारताच्या डावात मोलाची ठरली. पण पाकिस्तानी गोलंदाजांनी अखेरच्या दोन षटकांत विराटच्या बॅटला घातलेली वेसण या सामन्यात निर्णायक ठरली.