Coronavirus New Strain | ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाच्या आणखी एका प्रकाराचा विषाणू
कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जगावर ओढावलेलं संकट आता आणखी बळावताना दिसत आहे. पहिल्या (Coronavisus) कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत (Britain) ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. ज्यानंतर आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं (New Strain) ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याचं वृत्त आहे.
व्हायरसचा हा प्रकार दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत ब्रिटनमध्ये पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्याच विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य केलं होतं.