G20 Summit : NSGमध्ये स्थान मिळावं यासाठी भारताची मुत्सद्दी भूमिका, काय म्हणाले मंत्री पीयूष गोयल?
एनएसजी म्हणजेच अणुपुरवठादार गटामध्ये स्थान मिळावं यासाठी भारतानं मुत्सद्दी भूमिका घेत या मुद्याची सांगड हवामान बदलाशी घातली. हवामान बदलाचं लक्ष्य गाठायचं असेल तर भारताला अणुपुरवठादार गटामध्ये स्थान मिळायला हवं हे पटवून देण्याचा प्रयत्न भारतानं रोममधील जी-ट्वेंन्टी शिखर परिषदे दरम्यान केला. चीनच्या विरोधामुळे भारताला एनएसजीमध्ये स्थान मिळालेलं नाही. पण जी ट्वेंन्टी परिषदेच्या केंद्रस्थानी असलेल्या हवामान बदलाच्या मुद्याची संधी साधून, भारताला एनएसजीमध्ये स्थान मिळणं का महत्वाचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोळशावर आधारित प्रदूषणकारी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना प्रदूषण न करणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पांचा पर्याय द्यावा लागेल. त्यासाठी मोठं भांडवल आणि पुरेसा कच्चा मालही लागेल. त्यामुळे भारताला अणुपुरवठादार गटामध्ये स्थान मिळणं महत्त्वाचं आहे, असं उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं.