Corona Vaccine | फायझरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता
जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी (31 डिसेंबर) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करतील.
ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच 8 डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनच्या देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
डब्लूएचओने म्हटलं आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. "कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे," असं डब्लएचओचे वरिष्ठ अधिकारी मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं.