'Serum च्या लसीमुळं मेंदूवर परिणाम', चेन्नईच्या स्वयंसेवकाचा दावा Serum Instituteनं फेटाळला
पुणे : चेन्नई येथे चाचणी सुरु असलेली कोरोना लस घेतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप केले आहेत. या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि इतरांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र सीरम इन्स्टिट्युटने या व्यक्तीचे आरोप फेटाळले आहेत.
या व्यक्तीने ही लस असुरक्षित असून याची चाचणी, उत्पादन आणि वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषधी कंपनी अॅस्ट्रॅजेनेका यांच्याशी करार केलेल्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या व्यक्तीने नोटीसमध्ये असा आरोप केला आहे की लसीकरणानंतर त्याला तीव्र एन्सेफॅलोपॅथी, मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या आजाराची लागण झाली आहे. सर्व तपासन्यांमध्ये स्पष्ट झालं आहे की लसीच्या चाचणीने आरोग्य स्थिती बिघडली आहे. या व्यक्तीला 1 ऑक्टोबर रोजी ही लसी देण्यात आली होती.
सीरम इन्स्टिट्युने आरोप फेटाळून लावले
दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटने या व्यक्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले आहे, त्यात म्हटलं की, स्वयंसेवकाने नोटीसद्वारे केलेले आरोप चुकीचे आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभूती दर्शवत आहे. मात्र कोरोना लसीची चाचणी व स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थिती यांचा काहीही संबंध नाही. स्वयंसेवक त्याच्या वैद्यकीय समस्यांचा दोष कोरोना लस चाचणीवर चुकीच्या पद्धतीने करत आहे. या स्वयंसेवकाकडून चुकीच्या पद्धतीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची बदनामी केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी करेल आणि अशा दाव्यांपासून बचाव करेल, असं सीरम इन्स्टिट्युटने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.