Sangli wall collapsed | सांगलीतील आटपाडीत पावसामुळे घराची भिंत कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तर माणगंगा नदीला पूर आला आहे. तसेच पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले अनेक तलाव भरून गेले आहेत. आटपाडी तालुक्यातील भागातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. आधीच कृष्णा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून या भागातील तलाव, बंधारे भरून घेण्यात आले होते. त्यामुळे या पावसाने लगेच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तलाव ओसंडून वाहत आहेत तर शुक्रवारी दिवसभर संततधार आणि मुसळधार पडलेल्या पावसामुळे माणगंगा नदीला पूर आला आहे.