परिवहन मंत्री Anil Parab ED च्या रडारवर, मुंबईसह दापोली, पुण्यात छापेमारी : ABP Majha
मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीनं सकाळी सकाळी धाड मारली. सकाळी ६ वाजेपासून सुरु असलेली ही छापेमारी गेल्या १२ तासानंतरही सुरुच आहे . त्यामुळं अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलावर असल्याचं बोललं जातंय. अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचा समावेश आहे... मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीनं ही छापेमारी सुरु केल्याचं समजतंय.. मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीनं टाकलेल्या छाप्यामागे सचिन वाझे कनेक्शन असल्याची माहितीही मिळतेय. पोलीस बदल्यांप्रकरणी सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. तसंच अवैध संपत्तीतून दापोलीतील रिसॉर्ट विकत घेतल्याचा अनिल परबांवर आरोप आहे. या दोन्ही प्रकरणी ईडीनं अनिल परबांच्या मालमत्तांवर छापेमारी केल्याची माहिती मिळतेय.