Mira Road Murder Case : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या, शेजारी म्हणतात...
मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या मिरारोडमध्ये घडलीय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना उघडकीस आलीय. ५६ वर्षांचा मनोज साने असं आरोपीचं नाव आहे तर मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य असून ती ३२ वर्षांची होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून मनोज साने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. त्यानंतर हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो बाईकवरून जायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केली. मीरा भाईंदर उड्डाणपुलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटीतील ही घटना आहे. पोलिसांनी सानेला अटक केलीय. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपी सानेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.