Ambernath रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर तरुणीची धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या, अंबरनाथमधील थरार

ठाणे : राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होताना दिसत आहे. आताही तशीच एक घटना समोर आली असून अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीची हत्या करण्यात आली. अंबरनाथ पूर्व मध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. 

अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली असून त्या ठिकाणी हल्लेखोराने तरुणीवर सपासप वार केले. जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत वेळ झाला होता. डॉक्टरांनी त्या तरुणीला मृत घोषित केलं.

हल्ला कोणी आणि का केला? 

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे ब्रिज वरून जात होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीसा वाद झाला. त्यानंतर तरुणाने त्याच्याकडील धारधार शस्त्राने तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती तरुणी जबर जखमी झाली. रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 

त्या तरुणाने हा हल्ला का केला, त्यामागील कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी त्या हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola