Thackeray Reunion: 20 वर्षांनी 'ठाकरे' कुटुंब एकत्र, 'राज-उद्धव' भेटीने इतिहास घडला! Special Report
शनिवारी मराठीसाठी आयोजित मेळावा 'ना झेंडा ना अजेंडा' या व्रीदाने पार पडला. या मेळाव्यात सर्वांच्या नजरा ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबाकडे लागल्या होत्या. वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट हा लोकांसाठी आनंदाचा क्षण होता. संपूर्ण ठाकरे कुटुंबाला एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा या मेळाव्याच्या निमित्ताने पूर्ण झाली. ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्या, म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, एकाच व्यासपीठावर एकत्र आले. हे दृश्य पाहण्यासाठी ठाकरे कुटुंबियांचे जवळचे आणि त्यांचे चाहते आतुर होते. व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू उपस्थित होते, तर बाकीचे ठाकरे कुटुंब पहिल्या रांगेत बसले होते. राज ठाकरे यांच्या भाषणाला रश्मी ठाकरे यांनी हसून दाद दिली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. राज ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित इतर पक्षांच्या नेत्यांना आणि मान्यवरांना स्टेजवर बोलावले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची नावे पुकारण्यात आली. दोघांची एकत्र एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील या चुलत भावांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ते मनानेही जवळ आल्याचे दाखवून दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाजूला उभ्या असलेल्या आदित्य आणि अमित ठाकरे यांना हात धरून पुढे आणले. राज ठाकरे यांच्या शेजारी त्यांचा पुतण्या आदित्य ठाकरे तर उद्धव ठाकरे यांच्या शेजारी त्यांचा पुतण्या अमित ठाकरे उभे होते. यावेळी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांना स्मितहास्य केले. संपूर्ण ठाकरे कुटुंब स्टेजवर आले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे अशी ठाकरे घराण्यातील दोन्ही कुटुंब एकाच फ्रेममध्ये होती. राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी एकमेकांची आपुलकीने चौकशी केली. रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या दोन्ही जावांची मेळाव्यातली उपस्थितीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. दोन्ही जावांमध्ये काही क्षण हलक्याफुलक्या गप्पाही झाल्या. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये येण्याचा हा दुर्मिळ योग हिंदीच्या मुद्द्यावरून जुळून आला. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या उपस्थितांनी हा संपूर्ण क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवला. हा व्हिडिओ रिपोर्ट एबीपी माझाचा आहे.