ST Workers | एसटीतील 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती प्रस्तावाला मंजुरी
एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. कारण ही योजना 50वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सध्या एसटी महामंडळात तब्बल 27 हजार कर्मचारी पन्नाशी पार केलेले आहेत. या निर्णयामुळे महामंडळाचे दरमहा जवळपास 100 कोटी रुपयांच्या पगाराची बचत होणार असली तरी स्वेच्छा निवृत्तीसाठीच्या निर्णयासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबत एसटी महामंडळ राज्य सरकारकडे निधी मागणार आहे. जर राज्यसरकारने निधी मंजूर केला तरच हा निर्णय होऊ शकणार आहे. आज या प्रस्तावावर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं असून आता हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.