Pandharpur Karitiki Pooja : कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान कुणाला? Ajit Pawar की Devendra Fadnavis?
महाराष्ट्राच्या राजकारणामुळे आता मंदिर समितीसमोर नावाचं पेच उभा राहिला असून कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली . मात्र तोडगा न निघाल्याने अखेर विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आले . कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे . यंदा कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली . सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत . कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती . यवसरही दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नाही . या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली असली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने कोणाची नाराजी नको अशीच सध्याच्या समितीची भूमिका आहे . त्यामुळेच कार्तिकी महापूजेसाठी नेमके कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण द्यायचे याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे . आम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे असल्याने आता विधी व न्याय विभाग जो निर्णय देईल त्यानंतर कार्तिकी महापूजेचे निमंत्रण त्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले जाईल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे . आता यंदाच्या कार्तिकी एकादशीला मानाच्या वारकर्यासोबत मानाचा उपमुख्यमंत्री कोण हे विधी विभागाच्या सल्ल्यानंतर ठरणार .