भाजप उपमहापौर काळेंवर उपायुक्तांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा, काळे म्हणाले...

Continues below advertisement

 सोलापूर महानगर पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौरांवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, 'तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन' अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे.


यासंदर्भात पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून उपमहापौर काळे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री काळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र राजेश काळे हे घरातून फरार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


दरम्यान याप्रकरणी उपमहापौर काळे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी सधन घरातील असून मला कोणत्याही प्रकारच्या पैशांची गरज नाही. त्यामुळे खंडणीचा आरोप खोटा असल्याची प्रतिक्रिया राजेश काळे यांनी दिली. तसेच उपायुक्त धनराज पांडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्या संदर्भात मी तक्रार दिली म्हणून खोटी तक्रार दिल्याचा दावा देखील काळे यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram