Maharashtra BJP President: रवींद्र चव्हाण यांच्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान
भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. रवींद्र चव्हाण हे २००९ पासून डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार आहेत. २००२ साली त्यांनी भाजप युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. २००५ मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि २००७ मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले. २०१६ साली त्यांना फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते रायगड आणि पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्रीही होते. २०२० साली त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली. २०२२ साली शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून दोन खात्यांची जबाबदारी मिळाली आणि ते सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्रीही होते. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी आनंदाचा शिधा आणि रेशन आपल्या दारी यासारखे उपक्रम राबवले. मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास त्यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार असलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारताना रवींद्र चव्हाण यांनी आपला इरादा स्पष्ट केला. त्यांनी म्हटले, “मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान आहे.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची दमदार कामगिरी करणे, मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत ताळमेळ राखणे, तसेच पक्षावर होत असलेल्या आरोपांना सामोरे जाणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. कोकणातून भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.