Bhaskar Jadhav Emotional Video : डोळे पाणावले, कंठ दाटला..घरकाम करणाऱ्या लेकीला लग्नानंतर निरोप देताना भास्कर जाधव भावूक..
Bhaskar Jadhav Emotional Video : डोळे पाणावले, कंठ दाटला..घरकाम करणाऱ्या लेकीला लग्नानंतर निरोप देताना भास्कर जाधव भावूक..
रत्नागिरी: माणूस किती शक्तिशाली असो किंवा मोठा राजकीय पुढारी असो, कुटुंबीयांच्या बाबतीत तो हळवा असतो. अनकेदा मानलेली काही नाती ही कुटुंबाएवढीच जवळची असतात. त्यामुळे, सुख-दु:खाच्या लहान-सहान प्रसंगातून ही नाती उलगडली जातात. गुहागर (Ratnagiri) तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न (Marriage) ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणीी करताना बापमाणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो, तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्या तरळले.
भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे आज लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. डोळ्यातील रुमाल काढत त्यांनी आपले अश्रू पुसले. तसेच, स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की, 'सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे, तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.'