... तर एकनाथ खडसे 2014 ला मुख्यमंत्री झाले असते : रावसाहेब दानवे
मुंबई : राजकारणात नाराजी एकदाच उद्भवत नसते. छोट्या मोठ्या घटनांनी ती वर येते. एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले की, खडसेंची नाराजी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासूनच सुरु झाली. मात्र त्यांना त्या काळात मुख्यमंत्री करता आलं नाही. त्यांना मुख्यमंत्री करता आलं नाही यात चूक कुणाची होती? नाथाभाऊंना प्रदेशाध्यक्ष व्हा असं म्हटलं होतं. राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांनी देखील त्यांना गळ घातलेली की प्रदेशाध्यक्ष व्हा. पण त्यांनी माझी तब्येत चांगली नाही असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद नाकारलं. त्यांना काय माहीत की 2014 ला आमचं सरकार येणार आहे. जर ते प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं ते दानवे म्हणाले.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
मंत्री दानवे म्हणाले की, मी स्वत: मुक्ताईनगरला त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा. मात्र त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही प्रदेशाध्यक्षपद नाकारलं. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायचे. जर त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असतं तर ते मुख्यमंत्री देखील झाले असते, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राजकारणात संधी येत असते. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं. मात्र त्यानंतरही राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती दिली. मात्र तरीही ते समाधानी नव्हते. त्यांची पात्रता होती ती खाती सांभाळण्याची याबाबत दुमत नाही, असंही दानवे म्हणाले.