Punjab : Harbhajan Singh 'दुसरी इनिंग' सुरु करणार? 'आप'कडून राज्यसभा खासदारकीची संधी - सूत्र
क्रिकेटच्या मैदानात आपल्या फिरकीची जादू दाखवल्यानंतर क्रिकेटपटू हरभजन सिंग आता आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहे. कारण पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. क्रीडाप्रेमी भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीय. पंजाबमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचं आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिलं होतं. या विद्यापीठाची जबाबदारीही हरभजन सिंग यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. त्यातच पंजाबमधून राज्यसभेवर पाठवायच्या 5 जागांसाठी 31 मार्चला निवडणूक होणार आहे. यामध्ये आपकडून हरभजन सिंग यांना राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.