SASSOON HOSPITAL : नर्सची वेशभूषा घेऊन बाळाला पळवलं, आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षाचा पाठलाग केला आणि या बाळाची सुखरूप सुटका केली. आणि बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.
एक महिला तिच्या दोन मुलीसह उपचारासाठी ससून रुग्णालयात आली होती. मोठ्या मुलीला सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना जायचे होते. डॉक्टरांनी आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.