Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु; नागरिकांनी घाबरु नये : राजेश टोपे
कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आले आहेत. दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, अशी सतर्कता बाळगावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे.