Talegaon Accident : तळेगव दाभाडे नगरपरिषदेच्या CEOचं रॅश ड्रायव्हिंग, एन के पाटील यांना अटक
पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळं आणखी एक अपघात झाला असून यावेळी चक्क मुख्याधिकाऱ्यांनी एका वाहनाला धडक दिली आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनीच एका वाहनाला मागून ठोकर मारली. मुख्याधिकारी एन के पाटील यांना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मुख्याधिकारी पाटील यांनी मद्यपान केलं होतं का? याची पडताळणी करण्यासाठी त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं असल्याची माहिती आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अख्ख अग्रवाल कुटुंब तुरुंगात असून शिवानी अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस तपासात अग्रवाल पती-पत्नीने ब्लड सॅम्पल हेराफेरीतील सहभागावर भाष्य केलं आहे. त्यामुळे, हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत असून आता पुण्यातून आणखी एका अपघाताची माहिती समोर आली आहे. पुण्यातील तळेगावमध्ये आज दुपारी हा अपघात झाला. मुख्याधिकारी पाटील हे स्वतःच त्यांची खासगी गाडी चालवत होते, त्यावेळीच अपघात झाला असल्याची माहिती समोर येत होते. सुसाट वेगात निघालेल्या एन. के. पाटलांनी समोरच्या चारचाकीला जोराची धडक दिली, ही ठोकर इतकी जोराची होती की, धडक दिलेल्या वाहनाची त्यापुढच्या वाहनाला धडक बसली. यात दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणाला ही इजा पोहचली नाही. मात्र, अपघातानंतर मुख्याधिकारी स्वतःच्या घरी निघून गेले अन् स्वतःला घरात आतून कोंडून घेतलं.